२३. एक बदामी पान

पायाजवळी टप्कन् पडले
एक बदामी पान
लाल शेंदरी रंग तयाचा
मनमोहक ते छान

बघत राहिलो पानामाजी
त्यात गुंतले मन
भान कशाचे उरले नाही
हरपलेच तनमन

कोण असावा रंगारी तो
ऐसा किमयागार !
अद्भुत त्याची लीला पाहून
मन झाले हळुवार

लोभसवाणे पान देखणे
अवचित स्फुरले गान
गुणगुणताना नकळत कैसा
मी तर झालो सान !

गाणे गाता पाहून मजला
उपहासाने कोणी हसतील
हसता हसता पान निरखता
झणी तयांचे भाव बदलतिल

सृष्टीमधल्या पानफुलांतून
भावभावना उमलत राहो
निसर्गातील अद्भुत पाहून
प्रेमभावना फुलत राहो

२१.६.२००४, सोमवार
अनुक्रमणिकामागीलपुढील
२३. एक बदामी पान | सृष्टीचे हे रूप आगळे