२४. अबोल चाफा
बाग फुलांनी बहरून आली
तरी कुणावर रुसला चाफा
आज जाहला अबोल चाफा
जाईजुईच्या वेली हसल्या
गंधवती त्या जणू भासल्या
शुभ्र नि पिवळ्या शेवंतीला
बहर आला तरी हसेना, आज जाहला अबोल चाफा
मधु मालती, मुग्ध चमेली
गुलबक्षी अन् गुलाब वेली
खुळी कोरांटी, सदाफुली ही
फुलून आल्या तरी फुलेना, आज जाहला अबोल चाफा
धुंद मोगरा, निशिगंधासह
गुलाब राजा, रातराणीच्या
फुलण्याआधी उगाच हसला
तरी हसेना, कुणा कळेना, आज जाहला अबोल चाफा
दवबिंदूंचे वाळे लेऊन
पारिजात मग हळूच हसला
जास्वंदीच्या फुलण्यावाचुन आज जाहला अबोल चाफा
१९.७.१९८४