२५. कोरांटी

मी कोरांटी, मी कोरांटी
फुलांवाचुनी काया माझी, दिसते कैसी थिटी

मी कोरांटी साधी भोळी
अंगणात या उभी त्रिकाळी
रविकिरणांसह चढे नव्हाळी
मुग्ध नि कोमल होऊनो फुलते, मी या मंगल घटी

त्यागाचा मम रंग केशरी
पाच पाकळी जणू साजिरी
कळ्याफुलांनी दिसे गोजिरी
मोहरते मी मनोमनी ग, खुडता पूजेसाठी

मी नच सुंदर गुलाब-चाफा
काट्यांचा मजभवती ताफा
मार्ग भक्तीचा माझा सोपा
पावित्र्याने न्हाऊन निघते जैसी चंदनउटी

१७.१२.१९८०
सोलापूर
अनुक्रमणिकामागीलपुढील
२५. कोरांटी | सृष्टीचे हे रूप आगळे