२६. सूर्यफुला
सूर्यफुला रे सूर्यफुला
सांगशील का गूज मला?
रविकिरणांच्या स्पर्शाची का ओढ लागते सदा तुला?
रंग हळदिचा गर्दगहिरा
पाकळीतुनी भरला सारा
वाऱ्याचा तर तुज हिंदोळा
काय पाहशी मान वळवुनी, प्रकाशणाऱ्या पूर्वेला?
काळ्या काळ्या गोल मण्यासम
बीजवलयांकित आतिल गाभा
पीतवर्णाची लेऊन आभा
नीलाकाशी, सूर्यप्रकाशी काय शोधिशी प्राचीला?
रविकिरणांची दीप्ती पाहुनी
तेजोकण तू घेतो पिऊनी
देहच सारा जातो उजळुनी
त्या तेजातच झोकून देतो, अंती स्वतःला...
२५.९.१९७८
उस्मानाबाद