२७. रंगपंचमी

रंगपंचमी आज गड्यांनो
रंग खेळुया चला, पूर्वदिशेला गुलाल उधळित
बालरवी आला

वणवण फिरुनी दिनकर थकुनी
जाई विसाव्याला,
रंग खेळुनी रविकर गेला
दूर पश्चिमेला

सांजवेळी मग सांजपश्चिमा
रंग उधळिते नवे,
त्या रंगाला पाहुन उडती
पाखरांचे थवे

आषाढामधी निळ्या आकाशी
मेघ दाटती काळे,
वरुणराज तो मेघामधुनी
रंगपंचमी खेळे

पाण्याच्या घागरी भरून तो
सोडुनिया देतो,
आसावलेल्या धरतीला मग
चिंब चिंब भिजवितो

हिरवा हिरवा नेसुन शालू
धरती शृंगारते,
हिरव्या रंगामधुन तेव्हा
तृप्ती हुंकारते

कृष्ण होऊनी रंग खेळतो
वरुणराज अंबरी,
चिंब भिजोनी धरती होते
राधेसम लाजरी

रंगपंचमी अशी चालते
युगे लोटती किती!
निसर्गातिल किमया पाहुन
गुंगच होई मती!

३०.३.२००५, रंगपंचमी
अनुक्रमणिकामागीलपुढील
२७. रंगपंचमी | सृष्टीचे हे रूप आगळे