२९. पश्चिमा

रंग उधळिते रंग, पश्चिमा
रंग उधळिते रंग,
त्या रंगातच मन हे माझे
होऊनी जाते दंग

लाल तांबडा धूसर-पिवळा
मावळतीचा रंग वेगळा,
मुक्त केशरी, निळा-सावळा,
संध्येचा हा वेष आगळा
विविधरंगी त्या रंगांचा
मला लागला छंद!

शांत-स्तब्ध ती संध्याताई
मुळी न तिजला कसली घाई,
विश्रांतीस्तव घेऊन येई
दुनियेवरती मोहक दुलई,
त्या दुलईतून सकला मिळतो
अवर्णनीय आनंद!

सात्त्विकतेची लेऊन आभा
आज पश्चिमा होऊन आली
विरक्त-वेडी अबोल राधा,
श्रीकृष्णासम जडली तिजला
अद्वैताची अबोध बाधा !

१ जुलै २००१
अनुक्रमणिकामागीलपुढील
२९. पश्चिमा | सृष्टीचे हे रूप आगळे