३१. रंगाची माधुरी

आज पश्चिमा घेऊन आली
रंगाची माधुरी,
विविधरंगी विणते शेला
माया जादूगरी

जादू कसली वस्त्र अनोखे
भासे हे भरजरी,
निळीशार ती कडा नभाची
गमते सरोवरी

सरोवरी त्या डोलत होती
रक्तवर्ण कमळे,
रंग-केशरी, सोनल पिवळे
भासे केशर मळे

ढगामधूनी आकारत होती
मुग्धमृगी सावळी,
हरीण बावरे चौखुर उधळित
माती-लाल-पोवळी

त्या रंगाचे तरंग उठती
अजून अंतरात,
संध्यारंगी रंगून जाता
होते मग रात

फेर धरोनी नाच नाचते
रंगाची माधुरी,
श्रीरंगाची ऐकू येते
मंदमधुर पावरी !

२१.९.१९८५
अनुक्रमणिकामागीलपुढील
३१. रंगाची माधुरी | सृष्टीचे हे रूप आगळे