३२. मी माझेपण सरते जेव्हा

मला आवडते सांज पश्चिमा
नाना रंग उधळताना,
मनोहारी ते दृश्य देखणे
रवी अस्ताला जाताना

मन हे माझे हळवे होते
सूर्य सागरी बुडताना
हलके हलके धूसर होते
मावळतीला झुकताना

पशुपक्ष्यांचे थवे परतणे
घरट्यामाजी जाताना
लोभसवाणे चित्र देखणे
सांजवेळ ही सरताना

रानामधुनी गोपालासह
गुरेवासरे जाताना
वाऱ्यावरती ऐकू येतो
मंजुळ पावा गाताना

विविधरंगी रंग ढगांचे
नभामधुनी खुलताना
त्या रंगातच मन हे रमते
अशी पश्चिमा पाहताना

सांजवेळ ही अशीच नवथर
मनात काहुर उठताना
हृपटावर झणी उमटते
वेडी राधा रुसताना

दृश्य आगळे उदासवाणे
रोमरोमी या भिनताना
मी माझेपण सरते तेव्हा
नतमस्तक मी होताना...

जुलै १९८५
अनुक्रमणिकामागीलपुढील
३२. मी माझेपण सरते जेव्हा | सृष्टीचे हे रूप आगळे