३४. दृश्य आगळे
पश्चिम व्योमी
संध्यासमयी
लाल-केशरी
पिवळे-काळे,
निळे-सावळे
गर्द-गहिरे,
रंग साजिरे
रंगांमधल्या
अद्भुततेचा
नवा कुंचला
घेऊन हाती
कुणी रंगारी
चित्र चितारी
विविधरंगी
दुनिया देखून
मनःपाखरू
इवल्या देही
अधीर होऊन
जाय बावरून
जरा मोहरून
मनामनाच्या
कणाकणातुन
देहच सारा
तन्मय होऊन
दृश्यच अवघे
घेतो पिऊनी
पाहताच ते
दृश्य आगळे
लोभस भोळे
तन मोकळे
मनमोराच्या
अंगांगाला
फुटती डोळे...!
ऑगस्ट १९६९