३५. नियतीचे कालचक्र
संध्यारजनी तुझ्या मंदिरी
रविराज आला,
दिनभर फिरूनी म्लान होऊनी
जाई विसाव्याला!
गाईगुरे ही घरा परतली
पक्षिगण ये घरट्यामाजी
आजीच्या या कथा ऐकता
सान बाळ झोपला
विविधरंगी उधळण करूनी
दिशा पश्चिमा पार करोनी
दर्यामाजी माथा टेकून
रवी हा विसावला
चंद्र धावतो पृथ्वीपाठी
धरा धावते सूर्यासाठी
आसमंत उजळाया रवी
पुन्हा उगवतो प्राचीला
युगायुगांचा खेळ असा हा
अखंड अविरतपणे चालला
कालचक्र हे असेच फिरवित
नियतीचा हा खेळ चालला...!
१०.८.२००१
सोलापूर