३६. रंगबावरी

रंगबावरी, रंगबावरी
दुनिया माझी रंगरंगिली, रंगा उधळित आली
रंगबावरी, रंगबावरी....

ठाऊक नसे कुणा?
अवकाशाचा रंग निळा,
निळाईचा त्या नभराजाला
सहज लागला कसा लळा?
निळ्या नभाला पाहून झाली, जलाशयेही निळी...

रंग जांभळा लेऊन जांभूळ
नदीकाठी बैसला
हिरवा मरवा लेऊन सजली
धरणी नव शेला
शेल्यावरची मखमल हिरवी आमोदे डोलली...

पिवळी होऊन हळद गोरटी
कुलवधूच बनली
हळदीची मग शेवंतीला
संगतीच नडली
गंधित केशर-संत्र्यासह ती नारंगी रंगली...

लाल लाल मग लाल रंग तो
रक्तातच भिनला
लाल-तांबडा रंग साजिरा
कुंकवात नटला
डाळिंबासह त्या राघूची चोच लाल झाली...

काळा काळा रंग शेवटी
केसावर अडला
काकही काळा, मेघही काळा
राधेचा सावळा
त्या राघेला कृष्ण सख्याची बाधली ग मुरली...

सप्तरंगी ही कमान झाली
इंद्रधनू सजले
इंद्रधनू तो लोपून जाता
लख्ख उन पडले
नवरंगांची ही दुनिया सारी, रंगांतच रंगली...

१६.१२.१९८०
सोलापूर
अनुक्रमणिकामागीलपुढील
३६. रंगबावरी | सृष्टीचे हे रूप आगळे