३७. इंद्रायणीकाठी
मम नयनाने आज पाहिले क्षेत्र अलंकापूर
अंतरात या भावभक्तीने झणी लोटला पूर
इंद्रायणीच्या पावनस्पर्श थरथरलो अनिवार
रोमांचित ही झाली काया, झरती नेत्र अपार
धन्य जाहलो जल प्राशुनी पावन सरितेचे
पुण्यप्रद हे होईल अवघे जीवन मम साचे
दर्शनोत्सुक होऊनिया मी मंदिरात आलो
सात्त्विकता ती समोर पाहून उन्मन मी झालो
ज्ञानियाच्या चरणी सारा बदलून गेला नूर
अंतरातल्या दिव्य दर्शन जुळून आले सूर
वातावरणी प्रभा फाकली तेजोवलयाची
कर्पूरासम होय अवस्था माझ्या देहाची
भाग्यक्षण हा इथेच यावा अभागतासाठी
या देहाचे सोने व्हावे, इंद्रायणीकाठी
३.८.१९६८
आळंदी, पुणे