३८. जाग माधवा
जाग माधवा तू जाग
आळवितो मी भूपराग
नयन तुझे मिटलेले
त्रिभुवन हे निजलेले
शांत शांत विसावले
मन माझे आसावले
भेटीलागी आज...
नीलनभी मित्र येत
अवनीला जागवीत
यमुनेवर येतिल मग
जळास्तव कावडी या
गाती मधु द्विजराज...
गोशाला जागताच
धेनू-वत्स हंबरती
काकड-आरतीस
भक्तगण आळविती
साथ करी झांज...
पतितपावना राया
उघड नेत्रकमल हे
वाट तुझी पाहुनिया
मन माझे शिणले रे
दर्शन तू देई आज...
ऑगस्ट १९७६