३९. पाहिले ज्ञानेश्वर पाहिले
तुझिया चरणी भावपुष्प हे श्रद्धेने वाहिले
पाहिले ज्ञानेश्वर पाहिले!
किती योजने वाट चाललो
दर्शनास मी उन्मन झालो
भावभक्तीने पावन झालो
जीवित आज धन्य हे जाहले...
हृदयी वसतो भाव निरंतर
जनी भासतो प्रतिपरमेश्वर
शब्दसृष्टीचा तू तर ईश्वर
तव शब्दाचे रूप आगळे...
दास आगळा निवृत्तीचा
समूर्त पुतळा विरक्तीचा
ओवीमधुनी ओवी फुलता
बहरती कैवल्याचे मळे...
निरूपणास्तव गीता झाली
चारी मुक्ती ही ओळंगिली
सात्त्विकतेची सीमा सरली
पामरा अद्वैतचि उमगले...
१९७६