४. सुज्ञ माणसा
पहाट झाली निशाही सरली
वारा झुळझुळ,
पक्षी किलबिल करीत उठती
रव ये मंजुळ!
झुंजूमुंजू होता वदती
झाला रामप्रहर,
मंदिरातुनी कानी पडती
वीणेचे सुस्वर!
जल भरण्यास्तव तटी निघाला
सुवासिनी मेळा,
बातावरणी झणी दाटला
मंगलमय सोहळा!
वृषभ घेऊनी कृषीवलही मग
रानी-वनी चालला,
गुरे हाकारित गोपबाळ तो
पावरीत गुंतला!
मंगल काळी मंगलवेळी
कार्य मानवाचे,
मुखी तुझ्या रे नाम येऊ दे
राम नि कृष्णाचे!
दवडू नको रे सुज्ञ माणसा
साधुन घेई घडी,
याच घडीला तव देहाची
पावन होईल कुडी!
२.१०.२००३
सोलापूर