५. उष:काल

उषा हासली, उषा उजळली
सोनियाची दिशा,
प्रात:काळी मंगलवेळी उमलल्या
साऱ्या दाही दिशा

विरल धुक्यातून अवनीवरती
हास्य पसरले तरुवेलीवर,
कौलारावर उंच घरावर
रवी राजाची स्वर्णपताका
घेऊन आली उषा!

पूर्वदिशेला फुलून आला
रविराजाचा तेजपिसारा
मंद सुगंधित वायूसंगे
उच्चरवाने खगही गाती
आता सरली निशा!

कावड नेती गंगेवरूनी
पूर्वेला कुणी अर्घ्य देतसे,
सुवासिनी त्या सडे शिंपिती,
रांगोळीचे पद्म रेखिता
फुलल्या नव आशा

स्वच्छ कोवळे बाळ उन्हाचे
धरणीवरती रांगत आले,
चराचरासह सृष्टीलाही
उल्हासाने जागृत करिते
पवित्र परमेशा!

अनुक्रमणिकामागीलपुढील
५. उष:काल | सृष्टीचे हे रूप आगळे