४१. रुक्मिणीची आळवणी

अरे विठ्ठला तुला सांगते
येई रे लवकरी,
तुझी रुक्मिणी तुला विनविते
येई रे मंदिरी!

जनीसवे तू दळू लागतो
नामयाची खीर चाखतो
भोजनास्तव वाट पाहते
शिणले रे भारी!

चोखोबाची गुरे राखतो
कुंभाराची माती रांधतो
भक्तासाठी किती कष्टतो
काय म्हणावे तरी!

सावत्याचा मळा शिंपतो
गजेंद्राच्या हाकेसरशी
सत्वर धावुन जातो
मीच का मग दुरी?

आंधळ्याची होतो काठी
नाथही तू अनाथासाठी
उद्धारक तू पतितांसाठी
माझ्यासाठी तरी?

प्रिय भक्तांच्या कामामधुनी
तुला जराही उसंत नाही
तुला मोकळ्या दाही दिशाही
शोधित मी अंतरी!

२९.६.१९९८
प्रसिद्धी : तरुणभारत, आषाढी एकादशी १९९८
अनुक्रमणिकामागीलपुढील
४१. रुक्मिणीची आळवणी | सृष्टीचे हे रूप आगळे