४३. विनवणी
किती करावी तुझी विनवणी भक्तीच्या अंगणी
सदा रहावी मूर्त सावळी हृदयाच्या कोंदणी
मला न माहित पूजा-अर्चा, स्तोत्रही गावे कसे?
रात्रंदिन रे तव नामाचे मला लागले पिसे
सुमनामधल्या मधुगंधासम भाव उमलतो मनी
सदा रहावी मूर्त सावळी...
नयनामधल्या आर्त दर्पणी मूर्ती तुझी विलसे
जाणुन घेरे भावही भोळा, जनांत होई हसे
श्वासामधुनी तुला माधवा, स्मरतो मी निशिदिनी
सदा रहावी मूर्त सावळी...
अध्यात्माच्या मार्गामधली मम भोळी भक्ती
सर्व जगाला सांगू तुझिया गीतेची महती
अंतरातल्या तव प्रतिमेला आळवितो जीवनी
सदा रहावी मूर्त सावळी...
१४.१२.१९९८,
सोलापूर