४४. अनंता येई रे लवकरी
घेऊनी चक्र सुदर्शन करी, अनंता येई रे लवकरी....
आज येथले असुर मातले
सत्तालोलुप मत्त जाहले
त्या सर्वांना निर्दाळाया, येई पृथ्वीवरी...
सत्य येथले अवमानित रे
असत्य येते ढोल पिटीत रे
अन्यायाला दूर कराया, झणी प्रकट रे हरी...
भोगामध्ये रमती सारी
त्याग लोपले या संसारी
घन अंधारा दूर कराया, प्रकाश तू गिरिधारी...
सुरक्षित ना संस्कृती माता
दुरावलेली आज अस्मिता
त्यास रक्षिण्यासाठी आता, गरुड भरारी करी...
तू विश्वाचा पालनकर्ता
नव जीवन दे गीतामाता
अध्यात्माचा मार्ग आगळा उजळित ये रे हरी...
२४.१२.१९९७
सोलापूर