६. सृष्टीचे अद्भुत लेणे
क्षितिजावरती आज देखिले
चित्र नवे देखणे,
सृष्टीचे अद्भुत ते लेणे
रविबिंबासह लाल लाल ती
रक्तवर्णी हो कडा,
मुग्ध उषेच्या लज्जेस्तव का
कलंडला ग घडा?
सानंदे मग नभी उडाला
विहंगमेळा खुळा,
मंदसुगंधित वायूलाही
झणी लागला लळा
तरुवेलीसह भान विसरूनी
निर्झर गाई गाणे
सृष्टीचे अद्भुत ते लेणे १
रविबिंबासह धुके विरळ हो
अवर्णनीय शोभा,
चैतन्याच्या रसात न्हाली
सुवर्णमय ती प्रभा
उषः प्रभेच्या स्वप्नमिलनी
शुभमंगल ही घटी
वातावरणी भरून राहे
आनंदी केणे
सृष्टीचे अद्भुत ते लेणे २
१९८३
प्रसिद्धी : संचार, दिवाळी अंक