५१. शिवशंकर भोळा
चंद्रकांत ना चंद्र नव्हे पण चंद्र धरिशी का शिरी?
चंद्रासम जी शीतल सरिता गंगा माथ्यावरी
त्रिशूल डमरू ज्याचे हाती पिनाकपाणी जरी
शंख फुंकिता निनाद गर्जे, मोद भरे अंबरी
व्याघ्रांबर कटी नेसुन फिरतो स्मशानवासी जरी
चिताभस्म ते लेऊन भाळी तिन्ही लोकि संचरी
रुद्राक्षाच्या गळ्यात माळा, तशाच बाहूवरी
नररुंडाला धारण करूनी फिरतो चराचरी
नीलकंठ हे नाम शोभते, सर्पही गळ्यावरी
आत्मलिंगही अद्भुत त्याचे, रत्नकंकण करी
त्याच्या भवती सदाच असतो भूतगणांचा मेळा
ऐशा महाप्रभूस म्हणती शिवशंकर भोळा
भक्तालागी कृपाच करितो गौरीशंकर हा
कोप तयाचा उग्र भासतो, प्रलयंकार महा
तांडव करितो त्रिनेत्री जेव्हा भूमंडळ डळमळे
उमा-पार्वती समोर देखुन कोपही दूर पळे
असा आगळा नीलकंठ हा शिवशंकर भोळा
भक्तासाठी धावुन येतो हा तिन्ही-त्रिकाळा...
१४.९.२००१