५२. उदे ग अंबे उदे
उदे ग अंबे उदे, माते उदे ग अंबे उदे !
तुझ्या कृपेची छत्रसाऊली आम्हास लाभू दे!
मुकुट विराजे तव शिरकमळी
मळवट शोभे तुझ्या कपाळी
सुवर्णमाला वक्षी रुळती
रत्नकंकणे हाती लेऊन सकलांना शुभ वर दे...
वाघावरती बसून स्वारी
महिषासुर तो असूर मारी
भक्तजनांना सदैव तारून
प्रसन्न होऊन सकल जनांना, सुखसमृद्धी, यश दे...
विघ्नविनाशी तू महाकाली
नामगजर तव तिन्ही त्रिकाळी
ब्रह्मानंदी लागे टाळी
नवरात्रीला जागर होतो जगदंबे माते...
तुळजामाता तुळजापुरची
कुलस्वामिनी महाराष्ट्राची
यश, कीर्ती अन् शांती लाभु दे
तुझ्या प्रसादे भरून पावो हे देवी भगवते...
२३.२.२००२
सोलापूर