५३. समर्था, पावन मी झालो
दासाचा मी दास होऊनी, तुझिया दारी आलो
समर्था, पावन मी झालो...
जन्मानंतर सर्वाआधी
माय-पाश हे बंध जिवाचे,
बंधमुक्त हा जीव कराया
उन्मन मी झालो...
बाल-युवा या, क्षुद्र उपाधी
या देहाच्या प्रपंच-व्याधी,
व्याधीमधुनी मुक्त व्हावया
आतुर मी झालो...
जन्मभरीचे पाप हराया
राम-नाम तव आम्हा लाभले
नामजपाचे माहात्म्य देखुन
विनम्र मी झालो...
रामनाम हे नाम जपाया
दासाआधी, नाम घ्यावया
समर्थ तुमच्या सिद्धकृपेने
पुनीत मी झालो...
तव नामाच्या पुण्यप्रभावे
या देहाची नुरली-व्याधी
आधिव्याधीरहित अंती
मुक्त मुक्त झालो...
२८.२.१९८१
सोलापूर