५४. पालखीसोहळा

गजाननाची पुण्य पालखी
आली सोलापुरी,
दीपावलिचा सौख्य सोहळा
संत येता घरी

स्नेहल-वत्सल वैराग्याची
मूर्ती ती साजिरी
भावभक्तीचा पूर लोटला
या भोळ्या अंतरी

सगुण सात्त्विक रूप गोजिरे
शोभे गजानना,
सात्त्विकाची सीमा सरली
गमले माझ्या मना

आनंदाला उधाण आले
देखुनिया श्रीहरी
सूर अनामिक जुळून आले
अवचित या अंतरी

वातावरणी आज दाटला
मंगलमय सोहळा
जनीमानसी भरून राहे
कैवल्ये पुतळा

असा सोहळा अशीच मूर्ती
स्वप्नी मी पाहिली
उत्कटतेने समचरणावर
भावफुले वाहिली...!

७.७.१९८४
अनुक्रमणिकामागीलपुढील
५४. पालखीसोहळा | सृष्टीचे हे रूप आगळे