५५. स्वामी समर्था
अनंतकोटी ब्रह्मांडनायक, जय जय स्वामी समर्था
उद्धारक तू भवभयहारक तू, दीनांचा दुःखहर्ता
पूर्व दिशेला उषा प्रकटता उजळे दिशा दाही
तव नावाचा प्रकाश पसरो जीवनी लवलाही
चमत्कारही दाविलेस तू अगणित भक्तांना
नतमस्तक मी होतो पाहुन लीला तव नाना
शरणागत मी होऊन आलो तुझिया चरणाशी
तुझ्या दर्शन बिलया जाती पापांच्या राशी
संकटकाळी जीव सानुला घाबरून जाई
'भिऊ नको' तू म्हणून देतो भक्तांना ग्वाही
पवित्र मंगलमूर्ती तुझी रे, मनी सदा विलसे
रात्रंदिन रे तव नामाचे मला लागले पिसे
साधी भोळी भक्ती माझी गोड मानुनी घ्यावी
हीच प्रार्थना तव चरणाशी, भावजागृती व्हावी
श्रीस्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ
तुझिया नामे भरून राहे जीवनात अर्थ...!
१३.९.२००१