५६. जाणीव
मृदुल कळ्यांच्या श्वासामधुनी
गंधफुलांच्या कोशांमधुनी
तुझीच जाणीव होते,
उदारा तुझीच जाणीव होते...
अवकाशाच्या निळ्या महाली
झगमगतो हा निळा चांदवा,
आकाशगंगा वाहात जाते
अज्ञाताच्या अबोध गावा
त्या गावाची वाट शोधता रातच सारी सरते
दयाळा, तुझीच जाणीव होते...
पूर्व दिशेला उषा प्रकटता
मधुरवांची किलबिल होते,
तेजोमय हा भास्कर येता
नवचैतन्ये सृष्टी न्हाते,
त्या तेजाला आळविता ये हृदयानंदा भरते
कृपाळा, तुझीच जाणीव होते...
शांत भासतो अथांग दर्या
अनंतास ये जेव्हा भरते,
अजस्र लाटा तांडव करिती
गर्जत असतो महारुद्र तो,
रुद्रदर्शन स्तिमित होता काल-भान हरपते
उदारा, तुझीच जाणीव होते...
बिजलीसह मेघ गर्जता
रिमझिम वर्षा झणी बरसते,
इंद्रधनु रंगीन प्रकटते
मृद्गंधाच्या हुंकारातून तृप्ती ओसंडते
दयाघन, तुझीच जाणीव होते...
जुलै, १९८०