५७. मी पदयात्री
मी पदयात्री, मी पदयात्री
ओंकाराचा मी उद्गाता,
सत्य-शिवाचा ध्यास सदाचा
अलौकिकाच्या सुंदरतेचा,
ज्योतिर्मय हो सर्व धरित्री
मी पदयात्री, मी पदयात्री!
व्यास-वाल्मिकी मुनिजन सारे
बुद्ध महात्मे सांगुन गेले,
जीवन अवघे उजळुन येता,
अद्वैताला लंघुनी जाता
शांत कराया उभी धरित्री
मी पदयात्री, मी पदयात्री!
मी नच यात्री अल्प क्षणांचा
मी तर यात्री युगायुगांचा,
मुक्त मुक्त मी सेवित आलो
क्षण अलौकिक आनंदाचा,
चिरंतनाचा मी तर यात्री
मी पदयात्री, मी पदयात्री
१२.१.१९८५