६०. कैलासलेणी
स्वर्गामधले वैभव अवघे धरणीवर आले
मानवा, नवलचि हे घडले...
काळा कातळ कोरूनिया हो
सजीव केली सुंदर लेणी,
अप्रतिम ती किमया घडली
कैलासाची कोरीव लेणी!
पाषाणातिल कमललक्ष्मी
श्रीविष्णूचे पाय चेपिते,
भक्तासाठी धावुन येणे
कृष्णरूपाचा पत्थर बोले!
वासुकीचा दोर लावुनी
समुद्रमंथन जणु चालले,
अमृतकलशा घेई मनुजा
सजीव होऊन कातळ बोले!
शिल्पामधली उमा-पार्वती
सदाशिवावर नितांत भक्ती,
भक्तीमधुनी उमले प्रीती
पाषाणातिल त्रिशूळ बोले!
अजस्र कोरिव शिवशंकर तो
कैलासावर तांडव करूनी,
ध्यान-समाधी लावून बसतो
फत्तरातुनी शिल्प अवतरे!
गणरायाचे नर्तन चाले
तालही धरिती घुंगुरवाळे,
नारद-तुंबर गायन करण्या
पाषाणातुन सजीव झाले!
इंद्रपुरीची इंद्रसभा ही
नृत्य अप्सरा रम्य उर्वशी,
तालावरती नर्तन करिता
पाषाणातुन गीत उरे!
नवनवलाची कारागिरी ही
अबोध दुर्लभ शिल्पकला ही,
महत्प्रयासे जणु घडविला
पृथ्वीवरचा स्वर्गचि तो!
२३.७.१९८४
औरंगाबाद