६१. गीतेची गोडी
नको नको मना
गुंतू मायाजळी,
आसक्त मासोळी
जीवनी या
मानव्य ते शुद्ध
होऊनि निर्बुद्ध,
हरपते शुद्ध
जीवनाची
विरक्त वारूवर
आसक्तीच स्वार,
सुटे माझा धीर
पदोपदी
उगा आठवते
म्हण पूर्वजांची
जन्मा आला हेला
पाणी वाहुन मेला
उतराया थडी
करावी तातडी,
वाया जाते घडी
जीवनाची
अध्यात्माची गंगा
आली रे अंगणी
साधुन घे पर्वणी
जीवनाची
अमोल ही घडी
सोडताना कुडी,
गीतेची गोडी
चाखावी रे
१२.१२.१९९८