६४. वेदामधली ऋचा सांगते
वेदामधली ऋचा सांगते तत्त्व एक मनुजा,
हे जीवन म्हणजे सौख्याची सरिता...
सुखदुःखे ही दोन्ही, सम मानच आता
आशा-निराशा येता घर मनी स्थिरता,
नीर-क्षीरन्यायाने जगणे योगेशाकरता
हे जीवन म्हणजे...
ज्ञानेंद्रियास्तव मनुजा, तू ठेवी भान रे
या पंचेंद्रिय रसनेला तू शस्त्र मान रे,
त्या शस्त्राचा वार न करणे, जनहिताकरिता
हे जीवन म्हणजे...
नित्य-नूतन रूप हे त्या जगदिशाचे
दुजे नाव त्या देऊ नित उल्हासाचे,
जीवात्मा हा उन्नत होतो परमेशा स्मरता
हे जीवन म्हणजे...
हे आद्य युगातिल मनुजा, नित आनंदी जगणे
अति उल्हासे जगती, नित कर्मही करणे,
नितळ मनाचा झरा वाहू दे या विश्वाकरिता
हे जीवन म्हणजे...
या देहामाजी आता, तू वस्त्र मान रे
जे जीर्ण होऊनी विरते ते स्वेच्छेने त्याग रे,
मर्त्य जिवाला सतत लाभू दे ओढ शिवाकरिता
हे जीवन म्हणजे...
२२.६.२००२, बुधवार