६५. युगास पडली भ्रांत

का करिशी तू खंत, उर्मिले,
का करिशी तू खंत,

सोडुनी तुजला अशी महाली, दैव पाहते अंत...

राघव जाई वनवासाला
सवे घेऊनी जानकीला,
लीन होऊनी सेवेसाठी

कांत तुझा गे सज्ज जाहला, होऊ नको तू क्लांत...

सासू-सासरे दैवत आता
विसरू नको तू ब्रीद आपुले,
आवर अश्रू झणी तुझे गे

सार्थ कराया जीवन अवघे, साह तू दुःख अनंत...

तोड बंध ते आसक्तीचे
दीप उजळू दे मनी भक्तीचे,
रघुरायाच्या सेवेस्तव गे

सौख्य लोपले या जन्मीचे, भोगाच्या त्यागात...

मूक उर्मिला तिष्ठत दारी
चौदा वर्षे दुःख साहुनी,
उभ्या जीवनी व्रती राहुनी

नाही लाभले तिला सतिपण, युगास पडली भ्रांत...

६.८.१९६२
अनुक्रमणिकामागीलपुढील
६५. युगास पडली भ्रांत | सृष्टीचे हे रूप आगळे