६६. शर्मिष्ठा
मज नव्हते ठाऊक, भविष्य वदले कोणी?
मधुस्वप्नी झाले, ययातीची मी राणी!
हे महान पुरुषा, श्रेष्ठ ययाती राजा
स्वप्नात तुझी मी केली मानसपूजा
वाटले रहावे, होऊनिया तव साऊली
मी तुझिया चरणी, भावफुले वाहिली.
शतजन्माची ही पुण्याई मध्येच का सरली?
कन्या मीही राजाची पण दासी कशी झाली?
राणीमागुन दुःख सावरित प्रवेशिले महालात
काय वदावे ! किती जाहले हृदयी या आघात !
देवयानी ही जनलोकातच, नृपयाची राणी
दासी असुनी झाले तुझिया हृदयाची राणी
हे पुढ्यात आहे रूप तुझे इवलेसे
मी अधीर होता मलाच हसते कसे?
मी सदा ठेविली, तुझिया पायी निष्ठा
ही वाट पाहते, तुझी रे शर्मिष्ठा !
नको राज्ञीपण, मला लाभले जीवन दासीचे
मिटून डोळे म्हणेन झाले सार्थक जन्माचे...
२१.६.१९६२