६७. अहल्या
श्रीरामाच्या आगमनाची
मनास ये चाहूल,
या देहाला आज स्पर्श दे
परम-पुण्य पाऊल...
युगे युगे मी वाट पाहिली
अनंत दुःखे जरी साहिली,
अंधारातुन आज लागली
चंदेरी चाहूल...
किती काळ मी पडले होते
शिळा होऊनी अंधारात,
शापमुक्त मी होईन आता
आले सीताकांत...
रघुराजाच्या पदस्पर्शाने
शिळा अहल्या पावन झाली,
भावभक्तीचे सूर जुळाले
दैव होय अनुकूल...
१९८९