६८. आसावरी

आसावरी मी आसावरी
घेऊनी आपुल्या मृदुल करी
मधु-मिलिंद अधरी धरी,
गीत गुंजते नभांतरी

आसावरी मी आसावरी
कृष्णसख्याची पावरी,
सूर मधुर कानी पडता
मुग्ध राधिका होई बावरी

आसावरी मी आसावरी
अलगुज मज कुणी म्हणती,
सूर कानी मधु झरती
धुंद गुंग होई मती

आसावरी मी आसावरी
कुणी म्हणती मज पावा,
सुरात भिजते अवघी काया
जावे अद्वैताच्या गावा

आसावरी मी आसावरी
कुणी म्हणती मज मुरली,
वेणु मधुर जगी उरली
कृष्णसख्यासह अवतरली...

१६.६.२००३
अनुक्रमणिकामागीलपुढील
६८. आसावरी | सृष्टीचे हे रूप आगळे