७०. मला आवडते राधा गोकुळची
मला आवडते मला आवडते
राधा गोकुळची,
रात्रंदिन जी आळवित
बसते मूर्त सावळ्याची...
पायी पैंजण करिती रुणझुण
कंकण करिती लयीत किणकिण,
घुमे पावरी, होई बावरी
जाई यमुनेसी...
मधुमुरलीच्या तालावरती
गोपगोपिका नाचनाचती,
रासामध्ये दंग राधिका
नंद-किशोराची...
छंद लागला हरिभक्तीचा
बंध नुरे मग आसक्तीचा,
भवसागर ही तरून जाई
नारच गवळ्याची!...
१९६५
सोलापूर