७१. चालली राधा यमुनेवरी

सांज सकाळी वेळी अवेळी
ऐकुनिया पावरी,
चालली राधा यमुनेवरी...

साडी ल्याली पितांबराची
चोळी घाली मोरपिसांची,
कुंकुम नेत्री, काजळ भाळी
होत अशी बावरी, चालली...

नाद वेणुचा कानी पडता
कामधामही विसरून जाई,
रिताच डेरा घुसळित बसते
घडा घेऊनी करी, चालली...

गोपगोपिका बळेच पुसती
काय जाहले या राधेला ?
श्रीहरीचा का ध्यास लागला
तव भोळ्या अंतरी? चालली...

लोकामधुनी राधा उठली
जननिंदेची भीती नुरली,
अद्वैताची माया सरली
होऊन आसावरी, चालली...

१९६५
अनुक्रमणिकामागीलपुढील
७१. चालली राधा यमुनेवरी | सृष्टीचे हे रूप आगळे