७२. वेडी आस

मधुमुरलीच्या तालावरती
तुझीच गाते गाणी रे,
तव मुरलीच्या नादानेही
मी तर झाले वेडी रे...

नाद वेणूचा कानी पडता
विसरून जाते काम रे,
घुसळण करता डेऱ्यामाजी
नयना दिसतो श्याम रे...

श्वासाच्या या माळेमधुनी
तुझेच जपते नाम रे,
तुझ्यावाचुनी नाही आता
संसारी या राम रे...

घनमेघांचा रंग पाहुनी
तुझीच येते याद रे,
ये ये कान्हा राधेसाठी
देते तुजला साद रे...

द्वैतामाजी अद्वैताचा
आता सरला वाद रे,
नेई मजला पैलतीराला
आस जिवाला वेडी रे...

२८.७.१९७०
अनुक्रमणिकामागीलपुढील
७२. वेडी आस | सृष्टीचे हे रूप आगळे