७५. शोध
आठवणीचे मीन उसळती
या मानस-सरोवरी,
जलवलयासम तरंग उठती
भाव-तरल अंतरी
एक अनामिक मुग्ध भावना
झणी तरळते उरी,
होता आठव त्याच क्षणी ये
गोड शिरशिरी उरी
तीच राधिका तोच सावळा
पुन्हा अवतरे जनी,
बिंब तयांचे झणी उमटते
अवचित वेड्या मनी
त्याच रूपाला शोधित फिरतो
जनमानस मंदिरी,
पुन्हा ऐकूदे लोभसवाणी
धुंद मधुर पावरी....!
ऑगस्ट १९९०