७६. स्वप्न

काल मी स्वप्न अजब पाहिले
स्वप्नामधल्या भगवंताचे रूप मला भावलेऽऽ

स्वप्न अजब पाहिले.....

रूप सावळे रांगत आले
मोरपीस ते शिरी धरियले,
जावळ कुरळे भाळावरले
अधरावरचे हास्य मोकळे, मजला लोभावलेऽऽ

स्वप्न अजब पाहिले...

भगवंताचे रूप देखणे
मनास त्याचा ध्यास लागणे,
भावभक्तीचे फुले चांदणे
चांदण्यात त्या रमून जाणे, वेड जिवा लागलेऽऽ

स्वप्न अजब पाहिले...

मन हे वेडे असे कसे रे!
रात्रंदिन मुखी नाम वसे रे,
जनात होईल फुका हसे रे,
लोकलाज ना उरली आता, जीवन तुज वाहिलेऽऽ

स्वप्न अजब पाहिले...

त्या स्वप्नाने जादू केली
तव भेटीची आस लागली,
नाही कसली इच्छा उरली
दर्शनास्तव नयनही माझे, पैलतिरा लागलेऽऽ

स्वप्न अजब पाहिले...

१२.४.२००४, सोमवार
अनुक्रमणिकामागीलपुढील
७६. स्वप्न | सृष्टीचे हे रूप आगळे