७८. देवा, काय तुला मागू?
देवाऽऽ काय तुला मागू?
कृतज्ञ होऊन भावभक्तीने गीत तुझे गाऊ...
छाया मजवर माय-पित्याची
कधि न लागली झळ दुःखाची,
भरभरून तू दिलेस मजला, आणिक काय मागू?...
शैशव सरले हिंदोळ्यावर
तारुण्याचा काळही सुंदर,
तृप्त होऊनी जीवनसरिता, सुखे लागे वाहू...
निकोप दिधली शरीरसंपदा
मला न आली कधी आपदा,
पूर्ण कृपेने कृतार्थ झालो, आनंदे गर्जू...
सुखात सजले जीवन अवघे
कृतार्थताही मनी विराजे,
तुझ्या कृपेच्या पंखाखाली शांत-तृप्त राहू...
४.९.२००४, शनिवार