७९.

मन हे प्राजक्त होऊन विरक्त,
पायी मी आसक्त पांडुरंगी

मन हे कोरांटी पूर्व जगजेठी,
आनंदाची दिठी तुझे पायी

मन निशिगंध मिलनात धुंद,
कैवल्ये आनंद पायी तुझ्या

मन लाजवंती लीन होई अंती,
विलीन अनंती होईन मी

मन हे बकुळी घेई रे जवळी,
धन्य होय कुळी मायबापा

मन माझे चाफा अंतीचा सखा,
तुझिया सारिखा अन्य नाही

मन हे चमेली अर्पून राहिली,
तुझिया पाऊली पांडुरंगा

मन जास्वंदी अर्पू शिवानंदी,
टाळी ब्रह्मानंदी लागतसे

मन हे गुलाब राखी माझा आब,
देई मज लाभ वैकुंठीचा

मन जाई जुई अर्पू तव पायी,
पुर्नपी देही येणे नाही

मन फुलवंती देऊ भगवंती,
पुनरपि धरती येणे नाही

मन हे अबोली ईश्वरा अर्पिली,
आस ना उरली जीवनाची

मन हे मारवा देवा तू बरवा,
ठाव मज द्यावा तुझे पायी

मन हे प्राजक्त होई मी विरक्त,
तुजसी आसक्त पांडुरंगा

मन मधुमालती तुजसी अर्पिती,
लक्ष्मीचा पती पांडुरंग

मन हे कमळ अनंताजवळ,
जन्म हा सकळ पावन करी!

१ जानेवारी २००४
अनुक्रमणिकामागीलपुढील
७९. | सृष्टीचे हे रूप आगळे