८. बाधा
भर पुनवेच्या चांदरातीला, गर्द सुनील नभात
वातावरणी वाहत होता मंद नि शीतल वात
स्नात होऊनी आकाशगंगा होती संथ वहात
शांत नभी त्या विरहत होता रजनीदेवीचा कांत
शुभ्रधवल ते धुंद चांदणे, फुलले बघ विश्वात
मधुर-चांदणे सेवुनी अवधी, सृष्टी हो विश्रांत
सरोवराच्या काठी होती अगणित झाडे उभी
जळवंतीच्या निळ्या दर्पणी चंद्र न्याहाळी छबी
नक्षी रेखिती जलवलयांची अवचित त्या लाटा
लाटा कसल्या? परिकथेतिल अद्भुत त्या वाटा
रानवेलीची कुजबुज होती अनभिज्ञ ती जशी
नीरवतेतच रमून गेली जादुगारीण निशी
किर्रर्र दाट ते रान सभोती होते जणु माजले
चुकूनही ना तिथे उमटली मनुजाची पावले
गूढ रम्य ते स्थान अनामिक पाहुनिया गमते
दुजे शिवालय मनी कल्पुनी नतमस्तक होते
ओढ लागते त्या स्थानाची, नुरतो मी माझा
अनिकेतापरी एक अनामिक जडली मज बाधा!
१२.१२.१९७९
सोलापूर