८१. पहाट
पहाटवेळी क्षितिजावर ये शुक्राचा तारा
गंधित होउन येइ वनातुन थंडगार वारा
द्विजगण अवघे कलरव करिती उजाडताना झणी
नयनकमल मम उघडती अलगद उषःकालाच्या क्षणी
रविकरस्पर्शे कमलदलाची खुलती दळे दळे
सृष्टीदेवीचे प्रसन्न हासू प्राचीवर ओघळे
जागी होता अवनी सारी प्रसन्नवदना कुणी
हलक्या हाती सडे शिंपती तुळशीच्या अंगणी
झुळुकीसरशी अंगणात हो प्राजक्ताचा सडा
मित्रागमने आरक्त होई प्राचीवरची कडा
गोधन घेउन गोपालक ते रानीवनी चालले
घुंगुरघंटा कंठामधुनी गोड गीत बोलले
कावड नेती गंगेवरूनि भरभरून कोणी
रविबिंबाला अर्घ्य देतसे भावभक्त कोणी
पाण्यावरती तरंग उठती उल्हासाने अती
तरंग कसले? भक्तिभावना अज्ञाताच्या प्रती
पहाट ऐसी चैतन्याची रोज रोज यावी
मनपाकळी पावित्र्याने अवचित उमलावी
१९६५