अभिप्राय

  कवितासंग्रह वाचत असताना माझे मन अतिशय प्रसन्न झाले. समाधानी झाले. एकूण 'सष्टीचे हे रूप आगळे' हा पंडित नायगावकरांचा कवितासंग्रह वाचनात आला, सगळीच कविता तृप्तीचा, समाधानाचा अनुभव देऊन जाते. कवी सेवानिवृत्त आहे. आयुष्यातील अनेक चढउतार, सुखदुःख, यश-अपयश समाधानाने शांत वृत्तीने पचवले आहेत. वैयक्तिक विषादाचा किंवा आयुष्यातील दुःखाचा पट कवीने कोठेही मांडला नाही. जीवनाविषयी, सभोवतालच्या माणसांविषयी, आप्तस्वकीयांविषयी कोणतीही तक्रार, राग, आकस कवी सांगत नाही; तर आपल्याच माणसांचे गुणकौतुक, आनंदसोहळे सांगायला कवीला आवडतात. हे सर्व त्यांच्या पहिल्या कवितासंग्रहात विशेषत्वाने जाणवले. कुटुंबातील एक वयस्कर, ज्येष्ठ, कुटुंबाचा विस्तारही मोठा. अनेक स्वभावांच्या माणसांमध्ये राहूनही ते त्या माणसांतील चांगले शोधतात. त्याचे तोंडभरून कौतुक करतात. कोठेही टीकेचा सूर, नाराजीची छटा आपल्या वर्णनात आणत नाहीत. ही त्यांची क्षमाशील वृत्ती, कौतुक करण्याचा गुण इतरांना खूप काही शिकवून जातो. न बोलता बरेच बोलून सांगून जातो.

  'सृष्टीचे हे रूप आगळे' या कवितासंग्रहातील कविता साधारणपणे तीन प्रकारांत (विषयांच्या बाबतीत) मोडते. सृष्टी, निसर्ग, निसर्गातील विभ्रम आणि त्यांचे सौंदर्य कवी प्रसन्न मनाने वर्णन करीत आहे. सूर्यदेवा, उषःकाल, पाऊस, श्रावण आला, इंद्रधनू, अशा अनेक कविता उदाहरण म्हणून सांगता येतील. कवीचे निसर्गवर्णनही प्रसन्नता सांगते. सर्व सृष्टी जणू आनंदाने, तृप्तीने समाधानाने डोलत आहे. गात आहे. असं सुंदर वर्णन सर्व कवितांतून आढळले. कवितेला लय आहे, ताल आहे, गेयता आहे. या सर्वच कवितांना चाल लावली तर त्या कविता सुंदर गीत होतील अशा आहेत.

  परमेश्वर, परमेश्वराची भक्ती, भक्तीतील भाव, विनम्रपणा, लीनता, समर्पण या सर्व गोष्टी त्यांच्या भक्तिगीतात, कवितेत आढळतात. परमेश्वराला गाईलेली भूपाळी आहे. भक्तिगीत आहे. परमेश्वराची अगाध लीला आहे. त्याच्यापायी वाहिलेली भक्तिसुमने, भावसुमने आहेत. संताची थोरवी, त्यांचे महान कार्य यांविषयी आदरभाव आहे. संत कबीर, स्वामी समर्थ, श्रीराम, आदिविषयी कवी नितांत श्रद्धेने वर्णन करीत आहे. राधा, शर्मिष्ठा, आसावरी, अहिल्या यांचा भक्तिभाव, समर्पण, अबोल भक्ती कवी वर्णन करताना कोठेही त्यांच्या दुःखाचा उल्लेख येऊ देत नाही. दुःखाची तक्रार नाही. तर आपण पावन झालो पवित्र झालो हा कृतार्थ भावच अधिक आहे. वाचकांच्या मनाला हा भाव भिडतो. स्पर्श करतो.

  कोणापासून काय शिकावे? युगास पडली भ्रांत, या कविता वाचकांना विचार करावयास लावतात.

  'सृष्टीचे हे रूप आगळे' ही कविता शीर्षकगीत आहे. कवीला सृष्टीची जी विविध रूपे भावतात, आवडतात त्यांचे नितांतसुंदर वर्णन कवी करीत आहे. सर्वच कविता स्वान्तः सुखाय या पद्धतीच्या आहेत. कवितासंग्रहाला माझ्या हार्दिक शुभेच्छा!

- कमला नलावडे
मागील अभिप्रायकविता क्र. १
अभिप्राय - कमला नलावडे | सृष्टीचे हे रूप आगळे